साहित्य संमेलनांचा इतिहास

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी (२०१६) पिंपरी-चिंचवडमध्ये भरणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला हे संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष असतील. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

संमेलन सोहळा व महामंडळ
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा समस्त मराठी साहित्यप्रेमी जनतेचा तीन दिवस चालणारा एक आनंददायी सोहळा असतो. यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून तसेच विदेशातून शेकडो मराठी साहित्यिक, ग्रंथ प्रकाशक, मुद्रक, पत्रकार आणि हजारो रसिक वाचक आदी ग्रंथव्यवहाराशी संबंधित असणारी मंडळी सहभागी होतात. आजवर ८८ साहित्य संमेलने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर साजरी झाली आहेत. मागचे (88वे) संमेलन घुमान (पंजाब) येथे एप्रिल २०१५ मधे झाले होते.

साहित्य संमेलनांचा इतिहास

  • मुद्रणकलेमुळे एकोणिसाव्या शतकात भारतात फार मोठी वैचारिक क्रांती झाली. महात्मा जोतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आदी अनेक विचारवंत नेते सर्वच बाबतींत नवे विचार पेरत होते. प्रबोधनाचे युग आले तसे तात्विक वादविवाद झडू लागले. या वादविवादांची परिणती विधायकतेकडे वळावी यासाठी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि न्या. रानडे जागरूक होते. या विचारांतूनच त्यांनी ११ मे १८७८ रोजी पुण्याच्या हिराबागेत ग्रंथकारांना एकत्र आणून संमेलन भरवले. (हेच पहिले मराठी साहित्य संमेलन) न्या. रानडे यांनीच या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.
  • २१ मे १८८५ रोजी पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणेआळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमधे ग्रंथकारांचे दुसरे संमेलन झाले. या संमेलनाला तब्बल शे- सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. पहिल्या संमेलनाच्या तुलनेत या संमेलनाला खूपच चांगला प्रतिसाद लाभला.
  • तब्बल २० वर्षांच्या खंडानंतर १९०५ मध्ये तिसरे ग्रंथकार संमेलन सातारा येथे भरले. पाठोपाठ चौथे संमेलन पुणे येथे २७ मे १९०६ शनिवार, रविवार रोजी सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळच्या मयेकर वाडयात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा यशस्वी झाले, विधायक स्वरूपाचे झाले.
  • १९०६ चे पुण्यातील संमेलन ऐतिहासिक स्वरूपाचे ठरले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना या संमेलनात झाली. त्यानंतर प्रतिवर्षी संमेलने भरू लागली. ही परंपरा आजवर सुरू आहे. १९०९ च्या सातव्या बडोदा संमेलनापासून ‘ग्रंथकार संमेलन’ हे नाव कमी होऊन ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ हे नाव रूढ झाले.
  • साहित्य परिषद ही स्थायी स्वरूपाची संस्था स्थापन झाल्यामुळे आणि तिला १९१२ सालच्या अकोला संमेलनात घटनात्मक रूप प्राप्त झाले. त्यामुळे परिषद आणि संमेलन यांचे एका तऱ्हेने परस्परावलंबी नाते जडले. साहित्य परिषदेचा जन्म संमेलनाच्या व्यासपीठावर (१९०६) झाला व त्यानंतर 1907 पासून पुढली संमेलने परिषदेमार्फत भरवली जाणे अपरिहार्य होते. संमेलन भरविणे हे घटनेनुसार महत्त्वाचे कार्य झाले.
  • १९०७ ते १९६४ या कालावधीत साहित्य परिषदेमार्फत ४१ संमेलने भरविली गेली. ही संमेलने मात्र सलगपणे मात्र भरविता आलेली नाहीत. १९०७, ८ आणि ९ नंतर संमेलन एकदम १९१२ मध्ये अकोल्यास भरले. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांचा खंड पडून १९१५ साली ते मुंबईला भरले. मुंबईनंतर १९१७ (इंदूर), तर पाच वर्षांनी बडोदा आणि नंतर सहा वर्षे रिकामे जाऊन १९२६ साली पुन्हा पुण्याला, असा हा खंडित प्रवास झाला.
  • १९६१ साली ‘मराठी साहित्य महामंडळ’ या प्रातिनिधिक संस्थेची स्थापना झाल्यानंतर मोठे प्रतिवार्षिक संमेलन भरविण्याची जबाबदारी या महामंडळाकडे सोपविण्यात आली. तथापि, महामंडळ तीन वर्षे आपल्या पायावर भक्कमपणे स्थिर होऊ न शकल्याने ठाणे (१९६०), ग्वाल्हेर (१९६१), सातारा (१९६२) आणि मडगाव (१९६४) ही चार संमेलने भरविण्याचे कार्य परिषदेवर सोपविण्यात आले होते आणि ते तिने यशस्वीपणे पार पाडले.
  • १९०९ नंतरच्या पुढल्या दोन संमेलनांत ‘महाराष्ट्र’ऐवजी ‘मराठी’ शब्दाचा वापर केला गेला. १९३५ पासून १९५३ सालच्या अहमदाबाद संमेलनापर्यंत मात्र महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाचा सातत्याने वापर होत राहिला.
  • १९५४ साली नवी दिल्लीत भरलेले ३७ वे संमेलन भरले ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ या नावाने भरले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांनी संमेलन प्रतिनिधींना रेल्वे भाडयामध्ये सवलत मिळवून देण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी महाराष्ट्र हे प्रादेशिक नाव वगळून ‘अ. भा. मराठी साहित्य संमेलन’ असे नवीन व्यापक अर्थाचे नाव धारण करण्याची तांत्रिक आवश्यकता होती. काकासाहेबांची सूचना परिषदेने मान्य केली. दिल्ली संमेलनापासून रेल्वेभाड्याची सवलत (सिंगल फेअर रिटर्न जर्नी) मिळू लागली.