परिचय

डॉ. पी. डी. पाटील

डॉ. पी. डी. पाटील यांचा परिचय

पिंपरी-चिंचवड (जि. पुणे) येथे जानेवारी २०१६मध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची निवड झाली आहे. त्यांचा परिचय...

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी (पुणे) संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. पी. डी. पाटील यांचा जन्म १९५३ साली सांगली जिल्ह्यातील सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. डॉ. पाटील यांचे शिक्षण बी. एस्सी., एलएल. बी. आणि पीएच. डी. आहे.एक चांगला शिक्षणसंस्थाप्रमुख म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून डॉ. पाटील यांचा ज्ञानक्षेत्रात आजपर्यंतचा प्रवास राहिला आहे. आयुष्यातील सर्वोत्तम ध्येय साध्य करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे, ते-ते सर्व करण्याची डॉ. पाटील यांनी नेहमीच तयारी ठेवली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीवरून हे दिसून येते . विद्यापीठाचा विस्तार करताना अवश्य ते धाडस आपल्या अंगात असल्याचे डॉ. पाटील यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. स्वतः उच्चशिक्षित असल्याने शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आलेच; पण दर्जेदार शिक्षणाचा आपला दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा राबवायचा याचेही तंत्र त्यांनी विकसित केले.

आधुनिक जगात शिक्षणाइतके महत्त्वाचे आणि सर्वोच्च दुसरे असूच शकत नाही. अशा या क्षेत्रात डॉ. पी. डी. पाटील यांनी सर्वोत्तम कार्य करण्यासाठी निश्चित दृष्टिकोन ठेवला आणि त्या पद्धतीने विद्यापीठाच्या रोपट्याचा वटवृक्ष केला. त्यांच्या या प्रवासामागे शिक्षणाच्या माध्यमातून उच्चशिक्षित समाज निर्माण करण्याची प्रेरणा आहे. ‘ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण’ हे ध्येय ठेवून ते साध्य करणारी यशस्वी वाटचाल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आजवर केली आहे. भविष्याचे भान ठेवून संस्थांची भक्कम उभारणी करण्यात आली आहे. डॉ. पी. डी. पाटील यांची दूरदृष्टी निरनिराळ्या विद्याशाखांच्या वाढीत कशी प्रतिबिंबित झाली, याची अनेक उदाहरणे देता येतील. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असलेल्या विविध प्रकारच्या संस्था, विद्याशाखांमधील पायाभूत सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा जागतिक स्तरावरचा आहे. या बाबतीत कधीही तडजोड केली नाही. संस्था कशा उभाराव्यात व यशस्वीपणे चालवाव्यात, याचा वस्तुपाठ डॉ. पी. डी. पाटील यांनी घालून दिला आहे.

कर्मचाऱ्यांची प्रेरक शक्ती
कुठल्याही संस्थेचा विस्तार होण्याच्या प्रक्रियेत शेकडो-हजारो माणसे राबत असतात. त्यांना दिशा देण्यासाठी योग्य नेतृत्व असणे फार महत्त्वाचे असते. डॉ. पी. डी. पाटील या आघाडीवरही यशस्वी ठरलेत. विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील विद्याशाखांमधील अत्युच्य दर्जाच्या भौतिक पायाभूत सोयी,सुविधा दृश्य स्वरूपात दिसतात; मात्र, खरी संपत्ती आहे ती या निरनिराळ्या विद्याशाखांचे प्रमुखपद असलेली माणसे ! अशा माणसांमध्ये आणि शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये आकांक्षा जागृत करण्याचे काम डॉ. पाटील यांनी केले. त्यामुळे संस्था आपोआप विस्तारत गेली. डॉ. पाटील प्रेरक शक्ती म्हणून सगळ्यांच्या मागे आजही खंबीरपणे उभे आहेत.

नावाजलेले शैक्षणिक केंद्र
डॉ. पी. डी. पाटील यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी नावाजलेले शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. देशात आणि परदेशातही हे विद्यापीठ एक विश्वसनीय नाव म्हणून मान्यता पावले. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयास २००३ मध्ये अभिमत दर्जा दिला. त्यानंतर निरनिराळ्या विद्याशाखांमधील ८ संस्था शासनाच्या मान्यतेनंतर या अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून असा दर्जा मिळणे, हे विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा आणि पायाभूत सुविधा याबाबत पुरेसे बोलके आहे.

‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी, विद्यापीठाचे ॲवॉर्ड
राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) 3.62 एकूण पॉइंट्स ग्रेड सरासरीसह डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. पिंपरी येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रम गटात बेस्ट कॉलेज ॲवॉर्ड मिळाले आहे.

इंडो-यूएस फोरम
पुण्यात २०११ साली डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, अलायन्स फॉर यूएस-इंडिया बिझनेस, स्टेट लेजिस्लेटिव्ह लीडर्स फौंडेशनच्या वतीने तीन दिवसांची इंडो-यूएस एज्युकेशन कॉन्क्लेव्ह (भारत-अमेरिका शैक्षणिक परिसंवाद) पार पडली. डॉ. पी. डी. पाटील या कॉन्क्लेव्हचे मुख्य आश्रयदाते होते. पुणे हे भारतातील महत्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथील शिक्षणसंस्थांना अमेरिकन विद्यापीठांशी करार करण्याबरोबरच तेथील विद्यार्थ्यांना इकडे आकर्षित करणे, हा या परिसंवादाचा हेतू होता. या परिसंवादासाठी अमेरिकेतून शंभराहून अधिक मान्यवर सहभागी झाले होते. अमेरिकेतील एमआयटी, प्रिन्स्टन, फ्लोरिडा, डेन्व्हर यासारख्या आघाडीच्या विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक धोरण तयार करणारे अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटमधील लेजिस्लेटर्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्रणी उपस्थित होते. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डॉ. पी. डी. पाटील करीत असलेल्या कार्याबद्दल अमेरिकन काँग्रेसच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करून मानपत्रही देण्यात आले आहे.

सामाजिक दृष्टिकोन
डॉ. पी. डी. पाटील ग्रामीण भागातील आणि मूलतः शेतकरी कुटुंबातील आहेत. समाजकार्याची परंपरा घराण्यात असल्याने ते संस्कार आयुष्यात उपयोगी आले. शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्राकडे निव्वळ व्यावसायिक दृष्टीतून पाहून भागणार नाही, अशा संस्थांमधील शिक्षण समाजप्रवण होत नाही, समाजोपयोगी होण्याची शक्यता दूरच; शिक्षणसंस्था चालविताना प्राप्त होणारा आनंद तेव्हाच घेता येतो, जेव्हा प्रमुख व्यक्ती समाजाभिमुख होते, या साऱ्या बाबी डॉ. पाटील यांनी ओळखल्या. ‘समाज मरू द्या, आपण आपले बघा’ ही मनोवृत्ती सर्वच क्षेत्रांत पसरली आहे. मात्र, डॉ. पी. डी. पाटील यांनी अशी वृत्ती ठेवली नाही. संवेदनक्षम आणि जागरुकपणे त्यांनी आपले सामाजिक भान जपले. एवढया मोठया शिक्षणसंस्थांचे प्रमुखपद सांभाळताना स्वभावातील निर्मळता आणि दिलदारपणा अजिबात कमी होऊ दिला नाही. उच्च दर्जाचे शैक्षणिक व सामाजिक कार्य करताना हे गुण डॉ. पाटील यांना कामी आले.

रुग्णालयाच्या माध्यमातून समाजसेवा
पिंपरीस्थित ‘डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’शी संलग्न ६१ वॉर्ड आणि १४८० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आहे. हे रुग्णालय आता पिंपरी-चिंचवड परिसरातील नावाजलेले आरोग्य केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात रोज जवळपास ३००० बाह्यरुग्ण तपासणीसाठी असतात. उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या तपासण्या व अन्य चाचण्या तसेच उपचार पूर्णपणे मोफत केले जातात. दाखल झालेले रुग्ण व जवळ थांबणाऱ्या नातलगाला चांगले भोजनही निःशुल्क पुरविले जाते. रुग्णालयांच्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरात गरिबांसाठी मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन नेहमी केले जाते. आळंदी येथे आषाढी व कार्तिकी यात्रांदरम्यान रुग्णालयाच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येतात. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात भीमाशंकरजवळ डोंगर खचून माळीण हे गाव गाडले गेले होते. सामाजिक कार्याच्या भावनेतून रुग्णालयाच्या वतीने तेथील गरजूंवर मोफत उपचारांसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते.

भूकंपग्रस्तांना मदत
मराठवाडा आणि गुजरातमध्ये अनुक्रमे १९९४ व २००१ मधील भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत करताना डॉ. पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. विद्यापीठांतर्गत निरनिराळ्या विद्याशाखांमध्ये उपेक्षित किंवा आर्थिकदृष्टया मागास शेकडो विद्यार्थी मोफत आणि सवलतीत शिक्षण घेत आहेत. नाणेगाव व अप्पाची वाडी ही गावे संस्थेने एकात्मिक विकासासाठी दत्तक घेतली होती. पुण्यातील जायंट्स संस्थेची आंतरराष्ट्रीय परिषदही डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने प्रायोजित केली होती. संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत कर्मचाऱ्यांना नवे शिकण्यासाठी देशात आणि परदेशांतही जाण्यास मदतीसोबतच सतत प्रोत्साहन, पाठिंबा डॉ. पाटील यांच्याकडून मिळतो.

धार्मिक कार्यात सहभाग
पिंपरी-चिंचवड हा परिसर देहू, आळंदी या धार्मिक स्थळांशी जोडलेला आहे. महान गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी चिंचवड येथे आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवडमार्गे जातात. या वारीत सामील वारकऱ्यांची भोजनव्यवस्था डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी नित्यनेमाने करण्यात येते. आपल्या मूळ सांगली जिल्ह्यात डॉ. पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने निरनिराळे धार्मिक-सामाजिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. योगगुरू बाबा रामदेव, ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांची योग आणि ध्यानधारणेची शिबिरे आयोजित करण्यातही संस्थेचा सतत पुढाकार राहिला आहे.

साहित्य व सांस्कृतिक जवळीक
डॉ. पाटील यांनी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातले विद्यापीठाचे आणि व्यक्तिगत अस्तित्व तेवढेच महत्त्वाचे मानले. पुण्यात २०१० साली झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रायोजकत्व देताना त्यांची हीच भूमिका होती. पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद डॉ. पी. डी. पाटील यांच्याकडे आले आहे. हे संमेलन कोणतेही अवडंबर वा बडेजाव न माजवता करण्याचा त्यांचा मानस आहे. हे संमेलन एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. व्यक्तिगत प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहणारे डॉ. पाटील साहित्य संमेलनातही याच भूमिकेतून वावरताना दिसणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील सर्व साहित्यप्रेमी रसिक, नागरिक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातील सहकाऱ्यांच्या मदतीने हे शिवधनुष्य अत्यंत यशस्वीरीत्या पेलले जाईल, असा विश्वास डॉ. पाटील यांना आहे.

डॉ. पी. डी. पाटील यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान
• ‘टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम’च्या वतीने शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘ॲवॉर्ड ऑफ एक्सलन्स (२००७)
• ‘लायन्स क्लब इंटरनॅशनल’च्या वतीने शिक्षक दिनानिमित्त सन्मान (२००६)
• इंडियन कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट एक्झिक्युटीव्ह (मुंबई) च्या वतीने ‘समाज श्री पुरस्कार (२००५)
• ‘ग्लोबल इकॉनॉमिक्स कौन्सिल’च्या वतीने ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ (२००४)
• ‘ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशन’चा ‘भारतीय चिकित्सक रतन पुरस्कार (२००४)
• ‘अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिटयुट ‘मॅन ऑफ दि इयरʼ पुरस्कार (२००३)
• चिंचवड (पुणे) येथील मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टचा ‘मोरया पुरस्कार (२००३)
• ग्लोबल इकॉनॉमिक्स कौन्सिलच्या वतीने ‘राष्ट्रीय रतन पुरस्कार
• ‘पिंपरी- चिंचवड समाज भूषण पुरस्कारʼ (२००२)
• पिंपरी येथील अभियान फाउंडेशन आणि महिला मंडळाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (१९९९)
• अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ‘प्रतिभा संगम पुरस्कारʼ (२००९)
• अशोक सार्वजनिक विकास सोसायटीच्या वतीने ‘अशोक भूषण पुरस्कार (२००९)
• बहुजन व्यासपीठाच्या वतीने ‘बहुजन पुरस्कार
• दै. प्रहार (मुंबई) यांचा ‘प्रहार भूषण सन्मान’ (२०१५)