मनोगत

डॉ. पी. डी. पाटील

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठीजनांच्या सांस्कृतिक जीवनातील उत्सव. हा उत्सव मराठी साहित्य, संस्कृती यांची महती गातो तसेच मराठी भाषिकांना एका सूत्रात गुंफवूनही ठेवतो. साहित्य म्हणजे संस्कृतीचे दर्शन. वाचकाचे मन आणि जीवन समृद्ध बनविण्याचे अद्भूत सामर्थ्य साहित्यामध्ये दडलेले असते. वाचनातून चिंतन घडते, चिंतनातून कृती घडते आणि कृतीमधून व्यक्तिमत्व विकसित होते.

कोट्यवधींच्या मनात वसलेल्या मायमराठीचा समृद्ध वारसा आपण चालवित आहोत, हे खरोखरच आपले भाग्यच. ही धारणा मनात बाळगणारे आपण सारे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकदिलाने आपल्या मातृभाषेला अभिवादन करतो. देशभरात कोणत्याही भाषेला लाभला नसेल अशा थाटात संमेलनाच्या माध्यमातून आपण मराठीचा जागर करतो. याच परंपरेतील यंदाचे 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या, मोरया गोवासींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या, देहू-आळंदीसारख्या संतभूमीचा पवित्र शेजार लाभलेल्या पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे.येत्या जानेवारी महिन्यात होऊ घातलेले हे संमेलन आपणा सर्वांच्या सहभागातून, आशीर्वाद व सदिच्छांच्या बळावर संस्मरणीय ठरेल, यात शंका नाही. मराठी भाषा व संस्कृतीचा समृद्ध वारसा उलगडून दाखवतानाच भविष्यातील आव्हानांचा वेध यातून घेतला जाईल, नवी कात टाकून आपली भाषा दिमाखात पुढे जात राहील, असा ठाम विश्वास आहे.

डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला संमेलनाच्या आयोजनाच्या निमित्ताने मायमराठीच्या सेवेची संधी मिळाली, हा खरोखरच भाग्याचा क्षण आहे, असे मी मानतो. महाराष्ट्राच्या मातीत रुजून शैक्षणिक क्षेत्रात जागतिक स्तरावर नावलौकीक मिळवलेल्या एका संस्थेला मातृभाषेला अभिवादन करण्यासाठी लाभलेली ही अलौकीक पर्वणीच आहे, असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते. या आधुनिक पर्वामध्ये जगात मराठी भाषा-संस्कृतीची प्रतिष्ठा आणखी उंचावेल, या उद्देशाने आम्ही कार्यरत आहोत....आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वादाचे बळ पाठीशी आहेच.