पिंपरी - चिंचवड विषयी

उद्यमनगरी ते साहित्यनगरी

यंदाचे ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान पिंपरी-चिंचवडकरांना मिळाला आहे. ही गोष्ट हेच सिद्ध करते, की सतत यंत्रांचा खडखडाट ऐकू येणार्‍या या उद्यमनगरीच्या आत्म्यामध्ये एक साहित्याचा सुस्वरदेखील अनुस्यूत आहे. ज्या दिवशी संमेलनस्थळ म्हणून निवड झाली तेव्हाच हा स्वर अनाहत नादासारखा आहे, हे सिद्ध झाले. १९८५ मध्ये पिंपरी- चिंचवड नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले तेव्हापासून आजपर्यंतचा या नगरीचा इतिहास विलक्षण आहे.

पिंपरी म्हटले, की लहानपणी शालेय क्रमिक पुस्तकात पेनिसिलीनचा कारखान (हिंदुस्तान एंटिबायोटिक्स) असलेले शहर, असे वाचल्याची आठवण हटकून होते. तर, चिंचवडची ओळख म्हणजे महासाधू मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी अशी आहे. पवनेकाठी याच गणेशभक्ताची समाधी वसलेली आहे. मोरया गोसावींचे वास्तव्य असलेला मंगलमूर्ती वाडा अजूनही त्यांची परंपरा चालवीत आहे.

त्याचप्रमाणे, आधुनिक काळातील श्री वैष्णोदेवी देवस्थान म्हणजे पिंपरीत जणू जम्मूतील मातेचे स्थानच अवतरल्याची प्रचिती देते. मूळ पीठापुरमाणेच येथेही भुयार व पाणी असा देखावा निर्माण करण्यात आला आहे. सिंधी समाजातील भक्तांची वैष्णोदेवी मातेवर असलेली नितांत श्रद्धाच यातून दिसून येते.

चिंचवडची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी, की २२ जून १८९७ रोजी गणेश खिंडीत रँडचा खून करणार्‍या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे हे गाव आज ही येथे चापेकरवाडयाने त्यांचा स्मृतिदीप तेवत ठेवलेला आहे.

देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटा यांनी आपल्या प्रमुख कारखान्याची स्थापना येथेच १९६६-६७ मध्ये केली. हा टेल्को कारखाना (टीईएलसीओ- टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी) सध्या टाटा मोटर्स लिमिटेड या नावाने ओळखला जातो.

टाटाप्रमाणेच या परिसरात क्रॉम्प्टन ग्रीव्हज् , गरवारे, सँडविक एशिया, ऍटलस कॉप्को, मार्शल फोर्ब्ज्स , बजाज टेम्पो, बजाज ऑटो, कुपर इंजिनिअरिंग, पदमजी पेपर मिल अशा नामांकित कारखान्यांनी हा परिसर समृद्ध. परिसरातील रहिवाशांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह झाले आणि जणू सांस्कृतिक क्रांतीची तुतारीच फुंकली गेली. नंतर नुकतेच भोसरी येथेही अंकुश लांडगे सभागृह झाले. पिंपरी-चिंचवड परिसरात निगडी, आकुर्डी, रावेत , भोसरी, हिंजेवाडी , मोशी, ताथवडे, कासारवाडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव , वाकड, काळेवाडी, थेरगाव , रहाटणी, चिखली, पुनावळे, दापोडी आणि सांगवी ही गावे येतात. नुकतेच गेल्या दहा वर्षांत हिंजेवाडी येथे राजीव गांधी इन्फोटेक हे आयटी पार्क विकिसत झाले आहे. आयटी पार्क स्थापन झाल्यानंतर तर या परिसराचा कायापालटच झाला. मोठमोठे गृह प्रकल्प येथे आले. रोड कनेक्टीव्हीटीसाठी नवे रस्ते, उड्डाणपूल झाले, तर जूने रस्ते रुंद करण्यात आले. थेरगाव -रावेतला जोडणारा बास्केट ब्रिज हा पूल तर प्रेक्षणीय आहे. त्याचबरोबर नवनवीन शैक्षणिक संकुलेदेखील आकाराला आली. शहरात सध्या २३ महाविद्यालये आणि ३८ विद्यालये आहेत.

पिंपरी-चिंचवडची क्रीडासंस्कृती
अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी
हे परिसरातील पहिले स्टेडियम म्हटले तर वावगे ठरू नये. स्टेडियमप्रमाणेच येथे रमणीय जलतरण तलावदेखील आहे.

श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी
सन १९९२ मध्ये पिंपरी परिसरात एक क्रांतिकारी घटना घडली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यानिमित्ताने हे क्रीडासंकुल बांधले गेले.भव्य क्रीडासंकुलासमवेत खेळाडूंची निवास व्यवस्था नजीकच असलेले हे देशातील एकमेव ठिकाण आहे.ते बालेवाडी येथे उभारण्यात आले. येथे सर्व अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध आहेत.सन २००८ मध्ये येथे राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचे (कॉमनवेल्थ यूथ गेम्स) आयोजन करण्यात आले होते

ध्यानचंद स्टेडीयम , पिंपरी
येथे पॉलिग्रास मैदान असून त्यावर स्थानिक हॉकीच्या मोठ्या स्पर्धा होतात. या परिसराला खडकी जवळ असल्याने हॉकीचा इतिहाससमृद्ध वारसा लाभलेला आहे, हे येथे आल्यावर कळते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याचे जुळे शहर (टि्वन सिटी) असल्याचा लाभही पिंपरी-चिंचवडला मिळाला आहे. पुण्यातले अनेक कलाकार हे पिंपरी परिसरात वास्तव्यास आहेत. ज्येष्ठ कथक नर्तक नंदकुमार कपोते, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) अशी काही नावे सांगता येतील. प्रतिथयश व सिद्धहस्त ज्येष्ठ कथा-कादंबरीकार गोनीदा(गोपाल नीलकंठ दांडेकर) यांनी ज्या परिसरात वास्तव्य केले आणि ‘पवनेकाठचा धोंडी’ लिहिली, ती पवना याच परिसरातून वाहते व पुढे मुळेला मिळते.

पूर्वी लाटा पाहण्यासाठी पुणेकर मंडळी खास चिंचवडच्या पवना नदीकाठावरील मोरया गोसावी समाधीमंदिर परिसरात येत असत.
दरवर्षी गणेशोत्सवात पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीत पिंपरी-चिंचवड परिसरातील ढोलताशा तसेच झांझ पथके उत्साहाने सामील होतात. या परिसरातील या मराठमोळ्या मर्दानी खेळाचा दणदणाट, पुणेकरांच्या आणि पुण्यात विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या गणेशभक्तांच्या कानी आदळल्याशिवाय गणेशोत्सव संपूर्ण होतच नाही.