अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवा मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) या आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.

अधिक माहितीसाठी

महामंडळ - पदाधिकारी